चला कायदा शिकुया सहज आणि सोप्या भाषेत. Lets learn law in easy and simple language.





कायदा म्हणजे काय ?


कायदा म्हणजे ‍नियमांची संहिता होय. समाजाचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी कायदा आवश्यक असतो. कायदा बहुतेक वेळा चांगल्या लिखीत सुचनांच्या स्वरुपात असतो. कायदे हे मानवी विचारांचे सामान्य नियम आहेत, जे राज्याद्वारे स्विकारले जातात आणि लागु केले जातात. ज्याचे पालन करणे जनतेवर बंधनकारक असते आणि नियम न पाळल्याबद्दल न्यायपालिका शिक्षा करते. जगात आजही कायद्याच्या नावाखाली जगभरातील सरकारे नागरीकांसाठी कायदे करतात. कायद्याचे उद्दीष्ट्ये समाजाच्या आचरणाचे नियमन करणे हा आहे. ‘ कायद्याचे राज्य‘ ही संकल्पना घटनात्मक आधारावर चालणाऱ्या उदारमतवादी लोकशाही राज्यांमध्ये प्रचलित आहे. या प्रणालीमध्ये कोणीही कायद्याच्या कक्षेबाहेर काम करत नाही. यामागे कायद्याचे उदारमतवादी तत्व आहे. ज्यानुसार कायद्याचा उद्देश जनतेवर बंधने लादणे नसुन त्यांच्या स्वातंत्र्याची हमी देणे हा आहे.
भारतातील प्रमुख कायदे-

1. भारतीय राज्यघटना (CONSTITUTION OF INDIA)
2. भारतीय दंड संहिता 1860 (INDIAN PENAL CODE 1860)
3. फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 (CRIMINAL PROCEDURE CODE 1973)
4. भारतीय पुरावा कायदा 1872 (INDIAN EVIDENCE ACT 1872)



1) भारतीय राज्यघटना-(CONSTITUTION OF INDIA )


भारतीय राज्यघटना म्हणजेच भारताचे संविधान हा भारताचा प्रमुख कायदा आहे. संविधान हा एक संमिश्र दस्तऐवज असुन, त्याचा केवळ कायदा म्हणुन नव्हे तर कायदा बनविणारी यंत्रणा म्हणुन अन्वयार्थ लावला पाहिजे. भारत सरकारच्या लोकशाही कारभारासाठी त्याची तरतुद केली आहे. आपले संविधान हे एक लिखित स्वरुपाचे संविधान आहे. ‍दि.26 नोव्हे.1949 रोजी त्याचा स्विकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासुन ते अमलात आले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. त्यामध्ये 22 भाग आणि 395 अनुच्छेद आहेत.मात्र अनुच्छेदांची प्रत्यक्ष संख्या 444 आहेत. त्यात 12 अनुसुच्या जोडण्यात आल्या आहेत.

2) भारतीय दंड संहिता 1860 (INDIAN PENAL CODE 1860)

भारतीय दंड संहिता भारतात कोणत्याही नागरिकाद्वारे केलेल्या गुन्ह्यांची व्याख्या आणि शिक्षेची तरतुद करते. परंतु हा कायदा भारतीय सैन्याला लागु होत नाही. हा कायदा भारतातील सर्व राज्यांसाठी लागु आहे. हा कायदा इंग्रजांच्या काळात 1860 मध्ये लॉर्ड मेकाले यांनी तयार केला व भारतात लागु झाला आहे.

3) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (CRIMININAL PROCEDURE CODE 1973 )

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 हा कायदा भारतातील फौजदारी कायद्याच्या अमंलबजावणीसाठी तयार केलेली फौजदारी प्रक्रिया आहे. ते 1973 मध्ये तयार झाले आणि 1 एप्रिल 1974 पासुन भारतात लागु झाले. या कायद्यामध्ये फौजदारी प्रक्रिया कशी चालावी याविषयी माहीती दिलेली आहे.

4) भारतीय पुरावा कायदा 1872 (INDIAN EVIDENCE ACT 1872)

भारतीय पुरावा कायदा हा ब्रिटीश संसद द्वारे भारतात 1872 मध्ये लागु करण्यात आला. त्यात 11 अध्याय आणि 167 कलमे आहेत. ते तिन भागांमध्ये विभागले आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा करुन कायम ठेवण्यात आले आहे. हा कायदा न्यायालयाच्या सर्व कार्यवाहींसाठी लागु आहे. कोर्ट मार्शल सहीत.



( पुढील ब्लॉग मध्ये आपण ‍विविध कायदे आणि कलमांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद! )







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.