चॅप्टर केस म्हणजे काय ? What is chapter case ?
चॅप्टर केस म्हणजे काय ? What is chapter case ?
चॅप्टर केसेस अथवा चॅप्टर खटले यांचा अर्थ स्पष्ट नसला तरी असे म्हणता येईल की, फौ.प्र.सं.(Cr.PC 1973) चॅप्टर 8 मधील कलमे 107,108,109,110 ह्या अनुसार एखाद्या किवा अनेक इसमांवर चांगल्या वर्तणुकीचा मुचलका कार्यकारी दंडाधिकारीं (Executive Magistrate) समोर लिहुन घेण्यासाठी पोलिसांनी केलेली कार्यवाही होय. ही कार्यवाही अर्थातच प्रतिबंधात्मक उपाय या सदरात मोडतात.(Precaution is better than cure) म्हणजे गुन्हा घडण्यापुर्वीच गुन्हयाला प्रतिबंध करण्यासाठी ही कार्यवाही केली जाते. चॅप्टर हा इंग्रजी शब्द असुन,या शब्दाचा अर्थ अध्याय,धडा,पाठ किंवा प्रकरण असा करण्यात येतो. परंतु व्यवहारात चॅप्टर इसम म्हणजे लबाड इसम असा सर्रास अर्थ निघतो.या अर्थावरुन अथवा चॅप्टर 8 ह्यावरुन अशा पोलीस कारवाईला चॅप्टर केसेस किंवा खटले हे नाव पडले असावे. कारण हे निश्चित की, असे खटले प्रत्यक्ष गुन्हेगारावर अथवा आरोपीवर भरले जात नाहीत. हे खटले भरले जातात समाजातील अगर गटातील लबाड इसमांविरुध्द की, ज्यांच्या प्रवृत्तींमुळे अगर हेकेकोर स्वभावामुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होण्याचा संभव असतो. आणि कालांतराने प्रत्यक्षात हाणामारीचे प्रसंग उद्भवुन खुनखराबाही होण्याचा संभव असतो. समाजात विशेषत: ग्रामिण भगात परस्परांविरुध्द दोन गट निर्माण होत असतात. त्यांच्यातील वैमनस्याला वेळीच आळा घालण्याचे कार्य चॅप्टर खटले योग्य रीतीने करतात, असा पोलीसांचा अनुभव आहे. आणि म्हणुनच ही प्रतिबंधात्मक स्वरुपाची पोलीस कारवाई करावी लागते.
ज्या इसमावर अथवा इसमांच्या समुहावर चॅप्टर खटले भरले जातात, तो इसम किंवा इसमांचा समुह ‘आरोपी ‘ नसतो. त्याला अशा खटल्यात जाब देणार, गैर अर्जदार अगर सामनेवाला असे संबोधण्यात येते. ही कारवाई म्हणजे फिर्याद ही नसते, कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे पाठविलेला तो अहवाल असतो.
फौजदरी प्रक्रिया संहितेतील चॅप्टर (प्रकरण) 8 मधील विशेषकरुन कलम 106 ते 110 कलमांना चॅप्टर केसेस म्हटले जाते. आपण वरिल कलमांबद्दल माहीती घेवुया.
· कलम-106 दोषसिध्दी झाल्यावर शांतता राखण्यासाठी जामीन:-
जेव्हा सत्र न्यायालय किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालय एखाद्या व्यक्तीला पोटकलम (2) मध्ये दिलेल्या अपराधास अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी ठरविल आणि शांतता राखण्यासाठी अशा व्यक्तींकडुन जामीन घेणे असे त्यांचे मत हाईल तेव्हा, न्यायालय अशा व्यक्तीला शिक्षा आदेश देते वेळी त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त तीन वर्षाच्या कालावधीपुरते शांतता राखण्यासाठी, जामीनदारांसह किंवा त्यांच्याविना बंधपत्र (मुचलका) लिहुन देण्याचा आदेश देवु शकतील.
अ) हमला किंवा फौजदारी बलप्रयोग किंवा आगळीक करणे यामुळे जो अपराध घडतो तो अपराध.
आ) फौजदारीपात्र धाकडपटशाचा कोणताही अपराध
इ) ज्यामुळे शांतताभंग घडला किंवा तो घडण्याचा संभव असल्याचे माहीत होते असा कोणताही अपराध .
(या प्रकरणान्वये दंडाधिकारी सामनेवाल्यांकडुन बंधपत्र लिहुन घेवु शकतात. सामनेवाल्यास या प्रकरणाखाली डांबुन ठेवता येत नाही. )
· कलम 107 अन्यप्रकरणी शांतता राखण्यासाठी जामीन:-
क.107-1) या पोटकलमान्वये तीन कारणांकरिता चॅप्टर केस करता येते. अ) वारंवार दोन गटांमध्ये शांतताभंगाचे कृत्य होत आहेत. ब) सार्वजनिक शांतताभंग होत आहे. क) वारंवार दोन गटांमध्ये शांतताभंगाचे कृत्य घडत आहेत.
वरिल कारणांकरिता पोलीसांना चौकशी करुन कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात चॅप्टर केस पाठविता येते. म्हणजेच 1 वर्षापावेतो जातमुचलका अगर जामीनदारांसह जामीन घेता येतो.
क.107-2 वरीलप्रमाणे पाठविलेली चॅप्टर केस दोन प्रकारच्या मॅजिस्ट्रेटसना चालविता येते.
1) ज्या हद्दीत आरोपी राहतो त्या मॅजिस्ट्रेटला.
2) अगर आरोपी एका हद्दीत राहतो पण दुसऱ्या हद्दीत जावुन शांतताभंग करतो, तेथिल मॅजिस्ट्रेटला.
· कलम 108 प्रजाक्षोभक साहित्य प्रसृत करणाऱ्या व्यक्तींकडुन चांगल्या वागणुकीसाठी जामीन:-
1) जेव्हा कार्याकारी दंडाधिकारी यांना अशी खबर मिळेल की, स्वत:च्या अधिकार क्षेत्रात जो कोणी इसम, त्या अधिकार क्षेत्राच्या आत अगर बाहेर- पुढील मजकुराचा प्रचार लेखी अगर तोंडी किंवा इतर प्रकाराने जाणुन-बुजुन करीत आहे, तसा प्रयत्न करीत आहे किंवा त्याकामी प्रयत्न करीत आहे.-
(i).(अ) असा कोणताही मजकुर की, जो प्रसिध्द करणे भा.द.वि. कलम 124-अ, अन्वये किंवा 153-अ, किंवा 295-अ अन्वये शिक्षापात्र आहे, किंवा
(आ) कोणताही जज्ज आपले सरकारी कर्तव्य बजावीत असतांना,त्याच्यासंबंधी भा.द.वि. अन्वये अन्यायाची धमकी देण्याबाबत किंवा अब्रु घेण्यालायक होईल असा कोणताही मजकुर.
(ii). भादवी कलम 292 अन्वये त्यात नमुद करण्यात आलेला बिभत्स मजकुर लिहुन प्रसिध्द करील विक्री, आयात, निर्यात, भाड्याने देणे, सार्वजनिकरित्या प्र सिध्द करणे इत्यादी कृत्ये करील किंवा कोणत्याही रितीने तिचा प्रचार करील.
आणि अशा कोणत्याही बाबतीत सदरहु कार्यकारी दंडाधिकाऱ्याला त्याच्या मते पुढे काम चालविण्यास पुरेसे कारण् असेल, तर त्या इसमाकडुन एक वर्षाच्या जामिनासह किंवा जामिनाशिवाय मुचलका घेण्याबद्दल आदेश का देण्यात येवु नये असे फर्माविण्याचा त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला अधिकार आहे.
(2) छापखान्याबाबत आणि पुस्तके नोंदण्याबाबत अधिनियम 1867 अन्वये नोंदणी केलेल्या आणि त्या नियमांना अनुसरुन छपाई व प्रसिध्दी केलेल्या कोणत्याही लेखाचा संपादक,मालक, मुद्रक, किंवा प्रकाशक यावर अशा प्रसिध्द केलेल्या लेखातील कोणत्याही मजकुराच्या संबंधाने राज्य शासनाच्या किंवा राज्य शासनाने या कारणासाठी अधिकार दिलेल्या अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय किंवा त्यापासुन मिळालेल्या अधिकाराशिवाय ह्या कलमान्वये काम चालविता कामा नये.
· कलम.109 संशयीत व्यक्तींकडुन चांगल्या वागणुकीसाठी जामीन:
जेव्हा कार्यकारी दंडाधिकारी यांना अशी खबर मिळेल की, आपल्या अधिकार क्षेत्रात एखादा इसम आपले अस्तीत्व लपविण्याच्या उद्देशाने वावरत आहे. आणि तसे करण्यात त्याचा हेतु दखलपात्र गुन्हे करण्याचा आहे. असे मानण्यास कारण असेल तेव्हा एक वर्षाहुन जास्त नाही अशी जी मुदत ठरविणे सदरहु कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना वाटेल त्या मुदतीत चांगली वर्तणुक ठेवण्याविषयी जामीनानीशी किंवा जामीनाविना मुचलका लिहुन देण्याबाबत त्या इसमास हुकूम का करु नये, याचे कारण दाखविण्यास त्यास या कायद्यात ठरविलेल्या रितीने फर्मावण्याचा सदरहु कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकार आहे.
· कलम 110 सराईत गुन्हेगारांकडुन चांगल्या वागणुकीसाठी जामीन:
जेव्हा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अशी खबर
मिळेल की, आपल्या स्थानिक अधिकार क्षेत्रात विवक्षित मनुष्यास:-
अ) जबरी चोरी, घरफोडी,चोरी किंवा बनावट दस्तऐवज करण्याची सवय आहे. किंवा
आ) चोरीचा माल माहीत असुनही तो माल घेण्याची सवय आहे, किंवा
इ) चोरांचे रक्षण करणे, त्यास आसरा देणे, अगर चोरीचा माल लपविणे किंवा त्यांची व्यवस्था करणे या बाबतीत मदत करण्याची सवय आहे.किवा
ई) मनुष्य चोरुन नेणे, पळवुन नेणे, जुलमाने घेणे, असे अपराध करण्याची किंवा अपक्रीया करण्याची किंवा IPC प्रमाणे प्रकरण 12 अन्वये किंवा त्या कायद्याचे कलम 489-अ, 489-ब, 489-क, किंवा 489- ड या अन्वये शिक्षा होण्याजोगा अपराध किंवा तसे करण्याची किंवा तसे करण्यास सहाय्य करण्याचा प्रयत्न करण्याची किंवा तसे करण्यास सहाय्य करण्याची सवय आहे. किंवा
उ) शांततेचा भंग होईल असे अपराध करण्याची किंवा अपराध करण्याची किंवा तो अपराध करण्यास सहाय्य करण्याची सवय आहे, किंवा
ऊ) :1) खालीलपैकी एका किंवा अनेक कायद्यान्वये कोणतेही अपराध करण्याची किंवा तो अपराध करण्यास सहाय्य करण्याचा प्रयत्न करण्याची किंवा तसे अपराध करण्यास सहाय्य करण्याची सवय आहे.
(अ)औषधासंबंधीचा वा सौंदर्यप्रसाधनविषयक कायदा 1940
(आ) परकीय चलनासंबंधीचा अधिनियम 1947
(इ कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीसंबंधी कायदा1952
(ई) अन्नपदार्थ भेसळ करण्यास प्रतिबंध करणार कायदा 1954
(उ) जीवनावश्यक वस्तुंच्या नियंत्रणाबाबत कायदा 1955
(ऊ) अस्पृश्यता निवारणासंबंधीचा कायदा 1957
(ऋ) अबकारी करारासंबंधीचा कायदा 1962
(2) साठेबाजी नफेबाजी अन्नपदार्थ अगर औषधे यात भेसळ करणे अगर भष्टाचारास आळा घालण्यासंबंधी तरतुद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये शिक्षापात्र असणारा कोणताही गुन्हा किंवा
(अ) त्यास तारणाशिवाय मोकळे ठेवले असता त्यापासुन लोकांना धोका पोहोचण्याचा संभव आहे, इतका दु:साहसी प्रवृत्तीचा तो आहे.
तेव्हा सदरहु कार्यकारी दंडाधिकारी यांना योग्य वाटेल त्या मुदतीत ( तिन वर्षे) चांगली वर्तणुक ठेवण्याविषयी जामीनानिशी मुचलका लिहुन देण्याबद्दल त्या इसमास हुकूम का करु नये.याचे कारण दाखविण्यात त्यास ह्या कायद्यात पुढे ठरविलेल्या रीतीन फर्मावण्याचा सदरहु दंडाधिकाऱ्यांना अधिकार आहे.
टिप:- वरील सर्व चॅप्टर केसेस ह्या कार्यकारी दंडाधिकारी ( Executive Magistrate) म्हणजेच आपल्या भाषेत तहसिलदार यांच्या कोर्टात चालतात. अपवाद आयुक्तालयात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा अधिकार ACP दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास दिलेले असतात.

Post a Comment