समन्स म्हणजे काय ? आणि वारंट म्हणजे काय ? What is Sommons and Warrant?

 






समन्स म्हणजे कायआणि वॉरंट म्हणजे काय ?
What is Sommons and Warrant?

समन्स म्हणजे काय ?

    समन्स बजावण्याची प्रक्रीया Cr.PC 1973 या कायद्यात कलम.61 ते 69 मध्ये ‍दिलेली आहे. समन्स म्हणजे न्यायालयात खटला चालु असतांना, एखाद्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहण्यासाठी न्यायाधिशांनी काढलेला लेखी आदेश किंवा दस्तएवज होय. एखाद्या व्यक्तीविरुध्द कारवाई सुरु झाल्यानंतर त्या व्यक्तीने न्यायालयात हजर राहावे, यासाठी न्यायालयाच्या अधिकाऱ्याने हा लेखी आदेश जारी केलेला असतो. त्यात तारिख, वेळ आणि कारण नमुद केलेले असते. तसेच ज्या व्यक्तीला समन्स जारी केलेला असतो त्या व्यक्तीला तुमच्या विरुध्द कायदयाची कारवाई कोणी शुरु केली आहे. त्या कारवाईचे स्वरुप काय आहे. आणि तुम्हाला केव्हा न्यायालयात हजर राहायचे आहे. इ तपशिल समन्स मध्ये दिलेला असतो.  या समन्सचा हेतु संबंधित व्यक्तीने आपल्या ‍विरुध्दच्या तक्रारी व आरोपांना उत्तरे देण्याचा असतो. समन्स ‍मिळाल्यानंतरही ती व्यक्ती न्यायालयात उपस्थित राहीली नाही तर निकाल एकतर्फी दिला जातो.

READ MORE दखलपात्र गुन्हा,अदखलपात्र गुन्हा, पहीली खबर, N.C., फिर्याद ,चौकशी, अन्वेषण किंवा तपास म्हणजे काय 

समन्सशी सबंधीत कलमे:- क.61 ते 69

क.61 समन्सचा नमुना 

   या कलमात समन्सचा नमुना कसा असतो.याबद्दल माहीती दिलेली आहे.

(1)    न्यायालयाने काढलेले समन्स हे लिखीत दोन प्रतींमध्ये असले पाहीजे. व त्यावर न्यायालयाच्या अधिकाऱ्याची सही असली पाहीजे.

(2)    त्यामध्ये तारीख व वेळ दिलेली असते व त्यावर कोर्टाचा शिक्का मारलेला असतो.

समन्स बजाविण्याच्या पध्दती कलम 62 ते कलम 69 मध्ये दिलेली आहे.

क.62 समन्स कसे बजाविले पाहीजे.

(1) समन्स पोलीस अधिकाऱ्याकडुन, किंवा राज्यशासन या संबंधात नियम करतील, त्या नियमांच्या अधीन राहुन , न्यायालयाच्या अधिकाऱ्यांकडुन किंवा अन्य लोकसेवकांडुन बजावले जाईल.

(2) ज्या व्यकतीवर समन्स काढले आहे. त्या व्यक्तीला शक्यतो दोन प्रतिंपैकी एक प्रत द्यावी व दुसऱ्या प्रतिवर त्याची सही घ्यावी. या प्रकारे समन्सची बजावणी करावी.

क.63 नगरपालिका, ग्रामपंचायत अथवा संस्था यांच्यावर समन्सची बजावणी कशी करावी.

    नगरपालिका,ग्रामपंचायत, संस्था यांच्यावर समन्स बजावणी करतांना, त्यांच्या प्रमुख अधिकारी, मॅनेजर ‍किंवा सेक्रेटरी यांच्यावर समन्सची बजावणी केली पाहीजे. एखाद्या संस्थेचा प्रमुख अधिकारी लांब  ठिकाणी राहत असेल तर, त्याच्यावर रजीस्टर पोस्टाने समन्स बजावता येतो. ज्यावेळी रजिस्टर पोस्टाची पोच पावती येईल त्यावेळी समन्स बजावला गेला असल्याचे मानले जाईल.

क.64 ज्या व्यक्तीवर समन्स काढले असेल परंतु ती व्यक्ती सापडत नसेल तर समन्सची बजावणी कशी करावी.

    जर समन्स काढलेल्या व्यक्तीचा पुरेपुर शोध घेवुन सुध्दा ती सापडत नसेल तर, त्या व्यक्तीच्या घरातील जी प्रौढ व्यक्ती असेल त्या व्यक्तीला समन्सची प्रत देवुन दुसऱ्या प्रतिवर त्याची सही घेवुन समन्सची बजावणी करावी.

(नोट- त्या घरातील नोकर हा प्रौढ व्यक्ती मानला जाणार नाही.)

क.65 वरील क.62,63,64 प्रमाणे समन्सची बजावणी होत नसेल तर समन्स कसे बजवावे.

यथायोग्य तत्परता दाखवुनही वरील कलमांप्रमाणे समन्सची बजावणी होत नसेल तर, समन्स काढलेली व्यक्ती ज्या घरात राहत असेल त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर (दर्शनी भाग) समन्सची एक प्रत डकवुन समन्सची अमलबजावणी करावी.

क.66 सरकारी कर्मचाऱ्यावर समन्स कसे बजवावे.  

  समन्स बजावलेली व्यक्ती ही सरकारी नोकर असेल तर, समन्स काढणारे न्यायालय सर्वसामान्यपणे ती व्यक्ती ज्याठिकाणी नोकरीला असेल त्या कार्यालयाच्या प्रमुखाकडे समन्स पाठविल व तो प्रमुख त्या समन्सची रितसर बजावणी करुन त्या समन्सची प्रत आपल्या सहीनीशी समन्स बजावणाऱ्या न्यायालयाकडे पाठविल. अशी स्वाक्षरी समन्स रितसर बजावले असल्याचा पुरावा असेल.

क.67 अधिकार क्षेत्राच्या बाहेर समन्स कसे बजवावे.

जर न्यायालयाला असे वाटले की, समन्स काढलेली व्यक्ती आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. तेव्हा न्यायालय समन्स काढलेली व्यक्ती ज्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात राहते त्या न्यायालयाकडे ते समन्स पाठवेल.

क.68 ‍क.67ला पुरवणी कलम आहे.

 क.67 प्रमाणे समन्सची बजावणी झाली असेल आणि सुनावणीच्या वेळी समन्स बजावणारा अधिकारी हजर नसेल तेव्हा त्या अधिकाऱ्याने केलेले प्रतिज्ञापत्र व समन्स बजावल्याची प्रत , समन्स बजावल्याचे ग्राह्य धरण्यात येईल.

क.69 साक्षीदाराला पोस्टाने समन्सची बजावणी.

वर दिलेल्या पध्दतीशिवाय कोर्टाला आवश्यक वाटल्यास असे समन्स रजिस्टर पोष्टाने देखील पाठविता येईल. अशा प्रकारे पाठविलेले समन्स जरी नाकारले तरी पोस्टमनने दिलेल्या शेरा ग्राह्य धरण्यात येईल.

READ MORE चॅप्टर केस म्हणजे काय ?

कलम 70 ते 90 मध्ये वॉरंट बजावण्याची कार्यपध्दती सांगितलेली आहे.

 वारंट म्हणजे काय ? What is Wattrant ?

    वारंट म्हणजे एक प्रकारचा आदेश असतो, ज्यामुळे पोलीसांना अधिकार प्राप्त होतात. म्हणुना त्याला अधिपत्र म्हणतात. वारंट न्यायालयाकडुन पोलीस काँस्टेबल किंवा पोलीस अधाकाऱ्यांच्या निर्देशुन काढला जातो.ज्यामुळे त्यांना अटकेचा किंवा झडतीचा अधिकार प्राप्त होतात.

क.70 अटकेच्या वारंटचे स्वरुप व त्यांची मुदत

 क. 70 प्रमाणे न्यायालयाने काढलेला वारंट लेखी असतो. आणि त्यावर न्यायालयाच्या अधिकाऱ्याची सही असते. आणि न्यायालयाचा शिक्का असतो. असे वारंट ज्या न्यायालयाने ते काढले आहे, ते न्यायालय रद्द करेपर्यंत ‍किंवा त्याची अमलबजावणी होईपर्यंत अस्तीत्वात राहील.

(दंडाधिकाऱ्याने वारंट कायद्यानुसारच काढले पाहीजे एखाद्या व्यक्तीस अटक करणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे होय.)

क.71 जामीन घेण्याचा निर्देश देण्याचा अधिकार

वारंटाचे दोन प्रकार असतात. 1. जामीनाचे 2. बिगर जामीनाचे

 वारंटावर त्याप्रमाणे शेरा मॅजिस्ट्रेट लिहीतात. आणि त्यामध्ये किती जामीनदार घ्यावेत आणि ‍किती रकमेचा जामीन घ्यावा याचा निर्देश दिलेला असतो. तसेच कोणत्या ठिकाणी व केव्हा हजर राहावे याचा खुलासा असतो. काही वारंट बिगर जामीनाचे असतात.जामीनाचे असल्यास पोलीसांना जामीन घेवुन मोकळे करता येते. आणि बिगर जामीनाचे असल्यास कोर्टापुढे हजर करावे लागते.

क.72 वारंट कोणाला ‍निर्देशुन लिहीले जाते.

 अटकेचे वारंट सर्वसामान्यपणे एका किंवा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशुन  लिहीले जाते. परंतु अशा वारंटची तात्काळ अमलबजावणी होणे गरजेचे असेल व पोलीस अधिकारी उपलब्ध नसतील अशा वेळेस खासगी व्यक्तींना देखील ‍निर्देशुन वारंट दिले जाते.

क.73 खासगी व्यकतींकडुन वारंटची अमलबजावणी

या कलमाप्रमाणे खासगी व्यक्तीस मॅजीस्ट्रेट वारंट देतात. असे वारंट 3 कारणांकरीता खासगी व्यक्तींना देता येते. 1. शिक्षा झालेला आरोपी पळुन गेलेला आहे. 2. एखाद्या आरोपी विरुध्द जाहीरनामा काढलेला आहे. 3. एखाद्या आरोपीने बिगरजामीनाचा गुन्हा केलेला आहे आणि तो अटक चुकवत आहे.

    वरीलप्रमाणे खाजगी नागरीकाने आरोपीला अटक केली तर खासगी व्यक्तीने आरोपीला ताबडतोब नजीकच्या पोलीस अधिकाऱ्याकडे हजर करावे. आणि नंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांने मॅजीस्ट्रेटपुढे हजर करावे.

क.74 पोलीस अधिकाऱ्याला निर्देशुन लिहीलेले वारंट

एखाद्या पोलीस अधिकाऱ्यास वॉरंट दिलेले आहे. परंतु ते त्याला स्वत:ला बजाविणे शक्य नसेल तेव्हा त्या वॉरंटवर लेखी शेरा मारुन त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे (हवालदार दर्जाच्या)देता येते.

क.75 वॉरंटचा आशय आरोपीला सांगणे.

    या कलमाप्रमाणे वॉरंट  बजावतांना आरोपी वॉरंट कशा करता आहे हे सांगावे. आरोपीने वॉरंट  पाहण्याची मागणी केल्यास त्याला ते दाखवावे.

क.76 अटक केलेल्या व्यक्तीला विनाविलंब न्यायालयापुढे आणावे.

    या कलमाप्रमाणे  वॉरंटची बजावणी झाल्यावर अटक आरोपीला ते वॉरंट बिगर जामीनाचे असेल तर 24 तासांचे आत मॅजिस्ट्रेट पुढे हजर करावे. यात प्रवासाचा कालावधी वगळलेला आहे.

क.77 वॉरंटाची अमलबजावणी कोठे करता येते.

या कलमा प्रमाणे वॉरंटाची अमलबजावणी भारतात कोणत्याही ठिकाणी करता येते.

क.78 अधिकार क्षेत्राबाहे अमलबजावणी करण्यासाठी पाठवलेले वॉरंट

आरोपी जर वॉरंट काढणाऱ्या मॅजिस्ट्रेटच्या हद्दीबाहेरचा असेल तर त्याची अमलबजणी करण्याकरीता क.78 दिलेले आहे.

असे वॉरंट मॅजिस्ट्रेट पोस्टाने ‍किंवा एखादी व्यक्ती पाठवुन त्या भागातील पोलीस अधिक्षक अथवा पोलीस आयुक्त  अथवा कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे पाठवितो. त्यानंतर सदरचे अधिकारी संबंधी पोलीस स्टेशनला पाठवितात. अशा वॉरंटसोबत गुन्ह्याची थोडक्यात माहीती आणि जामीनावर सोडावे किंवा न सोडावे यांचा दस्तएवज पाठवावा लागतो.

क.79 अधिकार क्षेत्राबाहेर बजाविण्यासाठी पोलीस अमलदाराच्या नावाने केलेले वारंट

    क.79 प्रमाणे मॅजिस्ट्रेटने वॉरंट दिलेले आहे परंतु असे वारंट बजाविण्याकरीता परहद्दीतील अधिकाऱ्यांकडुन उशीर होईल असे वाटते, आणि त्यामुळे आरोपी  मिळणार नाही. तर वरील अधिकाऱ्यांचा शेरा न घेता पोलीस अधिकारी असे वॉरंट बजावु शकतील.

क.80 वॉरंट काढलेल्या व्यक्तीला अटक केल्यानंतरची प्रक्रिया 

    क.79 प्रमाणे आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीला त्या भागातील पोलीस आयुक्त,किंवा पोलीस अधिक्षक , ‍किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांचेपुढे हजर करावे व ते योग्य तो आदेश देतील.

क.81 अटक  केलेल्या व्यक्तीला ज्या दंडाधिकाऱ्यासमार नेले असेल त्याने अनुसरावयाची कार्यपध्दती.

क.80 प्रमाणे नेहमीच्या पध्दतीप्रमाणे परहद्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे अटक आरोपीला हजर करावे लागते. परंतु जर वॉरंटातील गुन्हा जामीनपात्र असेल तर आणि वॉरंट काढणाऱ्या मॅजि. पुढे आरोपीला हजर करणे शक्य असेल तर वॉरंट काढणाऱ्या मॅजि. पुढे हजर करता येते.

READ MORE  पोलीस काेठडी म्हणजे काय? आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय?

समन्स आणि वारंट यांत काय फरक आहे.

1.समन्स 2 प्रतित असतो.  तर वॉरंट एकच प्रति असतो.

2.समन्सवर कारकुनाची देखील सही असते. परंतु वॉरंटवर मॅजिस्ट्रेटची सही असते.

3.समन्स हे साक्षीदारांच्या नावाने काढले जाते. तर वॉरंटची बजावणी करण्याकरीता पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने काढले जाते.

4.समन्स बजावण्याचे 5 प्रकार आहेत. तर वॉरंटात प्रकार नाही. समक्ष बजावणी करावी लागते.

5. समन्सात बळाचा वापर करता येत नाही. वॉरंट बजावण्याकरीता बळाचा वापर करता येतो. उदा. CrPC क.47

       

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.